निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची पद्धत आहे. सरकारच्या या जुमलेबाजीविरोधात आधी शेतकऱ्यांनी आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. हे लोकप्रियतेचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेनेने शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही या दाव्यावर आमचा विश्वास नाही. तिजोरीत पैसा नसला तरी सरकार चालवणाऱ्यांच्या खिशात पैसा आहे व हा पैसा प्रत्येक निवडणुकीत लाटा उसळाव्या तसा बाहेर पडत असतो. निवडणुका लढवण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्याकडे बेहिशेबी, बेकायदेशीर ‘व्हाईट मनी’ आहे, असा आरोप शिवसेनेने केला.

शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय आहे. शेतकरी व सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका साम-दाम-दंड-भेदाने जिंकण्याइतके सोपे नाही. मुख्यमंत्री व त्यांचे सरकार इतके लोकप्रिय असते तर शेतकरी व कर्मचारी संपावर गेले नसते, अशा शब्दात शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.