भगवान श्रीरामासाठी प्रतिनिष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात असून हनुमानाला जातीचे लेबल लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घालावा, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे. अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे आहे, पण हे लोक रामभक्ताची जात शोधत आहेत, असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हा दलित असल्याचे म्हटले होते.यानंतर लंकादहन करणारा हनुमान नक्की कोण होता याबाबतचा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हा मुस्लीम असल्याचे म्हटले होते. तर उत्तर प्रदेशचे धार्मिक व्यवहारमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमान हा जाट असल्याचे म्हटले होते. तर भाजपाचे माजी नेते आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी हनुमान हा चिनी असल्याचा दावा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.

हनुमानाची जात शोधून उत्तर प्रदेशात नवे रामायण लिहिले जात असून रामायणातील प्रमुख पात्रांना जातीची लेबले चिकटवली गेली आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे आहे, पण हे लोक रामभक्ताची जात शोधत आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे. हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच सुरू असून हेच जर मुस्लिम किंवा ‘पुरोगामी’ मंडळींनी केले असते तर याच हिंदुत्ववाद्यांनी त्याविरुद्ध प्रचंड गदारोळ केला असता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

हनुमानाचे सारे जीवन राममय होते. हनुमानाने रामासाठी त्याग, युद्ध केले. त्यामुळे रामायणात, हिंदू धर्मात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या बरोबरीने स्वामिभक्त हनुमानाचे स्थान आहे. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला, असे शिवसेनेने सुनावले आहे.

‘भाजपाचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांनी कमी बोलायले हवे’ असे नितीन गडकरींनी म्हटले होते. याचा दाखलाही अग्रलेखात देण्यात आला भाजपाचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा, असे गडकरी म्हणतात. तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही का ?, असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.