भाजपाच्या माझं अंगण रणांगण आंदोलनावर महाविकास आघाडीतील पक्षांकडून टीका केली जात आहे. भाजपाकडून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेनं भाजपाच्या आंदोलनाला उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारकडून झालेली दिरंगाईच्या मुद्याकडेही महाराष्ट्र भाजपाचं लक्ष वेधलं आहे.

भाजपाकडून शुक्रवारी माझं अंगण रणांगण आंदोलनाची हाक देण्यात आली. राज्यभरात भाजपा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. “भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

आणखी वाचा- “देवेंद्र भौ आमचं खरंच चुकलं”, शिवसेनेचा टोला

शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडून झालेल्या दिरंगाईचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे. “भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सर्व स्तरावर शिकस्त करत आहे. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र काम करत आहे. जीएसटीचे पैसे केंद्रानं दिले नाहीत. ते त्वरित देण्यात यावेत. पॅकेज जाहीर झालं ते ४० दिवसांनी. अजूनही गाईडलाईन नाहीत. याउलट आरोग्य व जीवनावश्यक सुविधांचा मेळ राज्य सरकारनं घातला. केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांचा विचार २१ मार्चला केला असता वा १ मे रोजी काही धोरण व पावलं उचलली असती, तर मजुरांची दैना झाली नसती,” असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लज्जास्पद”! फोटो ट्विट करुन आदित्य ठाकरेंनी साधला भाजपावर निशाणा

“कधीही आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभरात लागू झाल्यावर आपत्ती व्यवस्थापन धोरण व आराखडा जाहीर केला जातो, तोही केला गेला नाही. ही दिशाभूल का? मराठीत कळत नसेल, तर गुजरातीतील एक म्हण यांना योग्य आहे. ‘दुखे पेट ने पिटो माथो’ म्हणजेच दुखतंय पोट व हाणतायत डोकं,” असा चिमटा नीलम गोऱ्हे यांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.