कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारसू यांच्या कार्यालयावर आज शिवसेनेनं मोर्चा काढला. तसंच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे, तिजोरीत काहीही भर पडलेली नाही त्यामुळे आयुक्तांनी छोट्या छोट्या विकासकामांना लागणारा निधीही अडवून ठेवला आहे. याच गोष्टीचा निषेध करत शिवसेनेनं मोर्चा काढत आयुक्त पी वेलारसू यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. मात्र आयुक्तांनी विकासकामं थांबवल्यानं मंगळवारी शिवसेनेनं आयुक्तांच्या बैठकीच्या खोलीत घुसून हंगामा केला. एवढंच नाही तर आयुक्त फक्त शिवसेना नगरसेवकांचा निधी अडवत आहेत भाजप नगरसेवकांचा नाही असाही आरोप यावेळी करण्यात आला.

मंगळवारच्या या आंदोलनात महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविकांनीही मोठा सहभाग नोंदवला. आंदोलन करूनही २७ गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय, रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये भर घालायला निधी नाही, कचऱ्याचा प्रश्नही प्रलंबित आहे असा आरोप यावेळी नगरसेवक आणि महापौरांनी केला आहे.

नवे आयुक्त पी वेलारसू हे फक्त भाजप नगरसेवकांची कामं करताना दिसतात आणि आमच्या कामांच्या फाईल्स अडवून ठेवतात असाही आरोप काही शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. भाजप नगरसेवकांना एक वागणूक आणि शिवसेना नगरसेवकांना दुसरी वागणूक असा भेदभाव आयुक्त का करत आहेत? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. आयुक्तांच्या दालनातल्या खुर्च्या उचलून अस्ताव्यस्त फेकण्यात आल्या आणि लवकरात लवकर निधी द्या आम्हाला विकासकामं करायची आहेत अशी मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

आयुक्त पी वेलारसू यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आल्याचं दिसून येतं आहे. महापालिका आर्थिक डबघाईला आली आहे, त्यामुळे विकासकामांसाठी शासनाकडून निधी घेण्यात यावा आणि लोकांचे प्रश्न सोडवले जावेत अशीही मागणी यावेळी शिवसेनेनं केली आहे.