शिवसेना आणि भाजप यांच्यातील धुसफूसीचे नवे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात परळी मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी ही माहिती दिली. शिवसेनेच्यावतीने सध्या राज्यभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान, साबणे यांनी ही घोषणा केली.

‘मातोश्री’वरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला परळीतून निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्याचे साबणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता परळी मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दरम्यान, कुणी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्यावेळी कोण निवडणूक लढवेल माहीत नाही. समोर जे काही असले तरी निवडणूक लढवावीच लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही असे सांगताना मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावल्याचे एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

परळीतून उमेदवारी द्यावी या मागणीवर अडून बसल्याने धनंजय मुंडे भाजपमधून बाहेर पडले होते. त्यामुळे या मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय लढत नेहमीच प्रतिष्ठेची होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.