मुंबई : तळागाळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी ‘एक बूथ २० यूथ’ या धोरणाचा भाजपला झालेला फायदा लक्षात घेऊन आणि विधानसभेच्या तोंडावर पुन्हा युती तोडून भाजपने दगाफटका केल्यास खबरदारी म्हणून भाजपच्याच धर्तीवर प्रत्येक गावातील प्रभागपातळीपर्यंत संघटनात्मक विस्तार करून पक्षबांधणी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

त्यानुसार राज्यातील एक लाख प्रभागांमध्ये एक लाख शाखाप्रमुख, महिला संघटक व सव्वादोन लाख उपशाखाप्रमुख अशी सव्वाचार लाख पदाधिकाऱ्यांची ‘भगवी फौज’ तयार करण्याची रणनीती आखण्यात आली झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै या वाढदिवसापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

भाजपने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेच्या तोंडावर आयत्या वेळी युती तोडत असल्याचे जाहीर केले होते. आता पुन्हा भाजप-शिवसेना युती झाली असली तरी आयत्या वेळी पुन्हा दगाफटका होऊ शकतो अशी भीती शिवसैनिकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू व उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यातील भाषणात या वेळीही भाजपकडून अचानक दगाफटका होऊ शकतो, ही भीती बोलून दाखवली. तसेच त्या परिस्थितीत २८८ जागा लढायची तयारी ठेवावी लागेल व त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले.

राज्यातील सर्व जिल्हा व तालुकाप्रमुखांना प्रत्येक गावातील नावे शाखाप्रमुख-उपशाखाप्रमुख, महिला संघटक या पदांसाठी देण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावातील सर्व जाती-जमातींना यात स्थान मिळावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात सर्वसमावेश अशी पक्षसंघटना उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच संघटनात्मक बांधणीच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे धोरण शिवसेनेने आखले आहे.

भगवा पंधरवडा

केवळ पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांद्वारेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला शिवसेनेशी जोडून पक्षसंघटनेचा विस्तार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी असतो. त्याआधी १५ दिवस अशारीतीने १४ जुलै ते २७ जुलै या कालावधीत राज्यभरात भगवा पंधरवडा संकल्पना राबवली जाणार असून गावागावात शिवसेनेसाठी सभासद नोंदणी केली जाणार आहे.