विधानसभेत शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे. सरकारकडून जनतेच्या विरोधात जे निर्णय घेतले जातील त्याला शिवसेनेचा कायमचा विरोध राहील. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना सक्षमपणे बजावणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले.
शहरातील मिरकरवाडा येथील मच्छीमारांसाठी सुरू करण्यात आलेल्या डिझेल पंपाच्या उद्घाटनासाठी खा. राऊत रत्नागिरीत आले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी रत्नागिरीचे आ. उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी, राजेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी खा. राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विश्वास टाकून लोकप्रतिनिधींना निवडून दिले. विधानसभेत जिल्ह्यातील पाच आमदारांना पाठवले. याची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सपत्नीक कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत. सध्या विधानसभेत शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका निश्चित केली आहे. सरकारकडून जनतेच्या विरोधात जे जे निर्णय राहतील त्याला शिवसेनेचा ठाम विरोध राहणार आहे. सत्तेत सहभागी होण्याबाबत भाजपने पुन्हा संपर्क साधला तर सेनेकडून चच्रेची दरवाजे खुले करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खा. राऊत म्हणाले, ज्या गोष्टींची शक्यताच नाही त्याचा विचार कशाला करायचा? विरोधी पक्षाची भूमिका सेनेने निश्चित केली असल्यामुळे ही भूमिका आम्ही सक्षमपणे बजावणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
भाजपने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने टाकला असता तर मुख्यमंत्र्यांचे धारिष्टय़ दिसून आले असते. स्वत: पळ काढायचा आणि दुसऱ्याला आव्हान द्यायचे, या गोष्टीला काहीच अर्थ नाही, असेही खा. राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना खा. राऊत म्हणाले, सेनेचे आमदार पक्षावर निष्ठा असणारे आहेत. बाजारात इमान विकायला ठेवलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
सुरेश प्रभू यांच्याबाबत विचारले असता प्रभू आता भाजपचे झाले आहेत. तरीही रेल्वेमंत्री म्हणून त्यांची भेट घेणार आहे. या वेळी कोकण रेल्वेला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे निश्चितच पाठपुरावा करणार आहे. सुरक्षा आयोगाच्या सूचना धाब्यावर बसवून कोकण रेल्वेचा कारभार चालला आहे. यासाठी संबंधितांबरोबर तातडीच्या बठकीची मागणी आपण रेल्वेमंत्र्यांकडे करणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे २२ पासून कोकण दौऱ्यावर
लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेचे पाच आमदार प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २२ व २३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती या वेळी खा. विनायक राऊत यांनी दिली. २२ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन सपत्नीक घेणार आहेत, तर दुपारी शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या पत्नी येथील निवासस्थानी सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.