कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांप्रमाणेच शिवसेनाही राज्य सरकारला अधिवेशनात धारेवर धरणाऱ असल्याची चिन्हं आहेत. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारी विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे शेतक- यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावरून अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केलं. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतक-यांची कर्जमाफीची घोषणा त्वरित करावी व शेतक-यांचा सातबारा कोरा करावा असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला ठाणकावले आहे.

उत्तरप्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. तोच मुद्दा पकडून विरोधकांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. मग शेतक-यांची कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह शिवसेनेनेही लावून धरली आहे. उत्तरप्रदेश सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे बुधवारच्या अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६ मार्चपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाच विरोधकांच्या अजेंडावरील महत्वाचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षांकडून यावर प्रतिक्रियाही येत आहेत.

उत्तरप्रदेश सरकार मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेते मात्र महाराष्ट्रातील सरकारला अडीच वर्षे होऊनही निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
तर “महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती उत्तरप्रदेशपेक्षा गंभीर असताना भारतीय जनता पक्षाचे सरकार येथील शेतक-यांना कर्जमाफी देत नाही, परंतु उत्तर प्रदेशात कर्जमाफी केली जाते, हा महाराष्ट्रातील शेतक-यांवर अन्याय आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.