गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षातील नेत्यांचे भाजपा प्रवेश सुरू आहेत. एका कार्यक्रमादरम्यान यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ‘चिंता करू नका. उडाले ते कावळे!’ अशी टीका केली होती. शिवसेने त्यांच्या याच वक्तव्यावर सामनाच्या अग्रलेखातून खरमरीत टीका केली आहे. जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. तसेच कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात, असे म्हणत शिवसेनेने पवारांवर निशाणा साधला आहे.

‘जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू’ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त होता. शरद पवार यांनीच त्या कावळ्यांना इतर पक्षाच्या पिंजऱ्यातून पळवून आणले होते. परंतु पंधरा वर्ष सत्तेत राहूनही त्या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाही. अखेर कावळे हे कावळेच राहिले, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला असून विकास आणि जनतेचे कल्याण याच अजेंड्यावर सत्ता आणि जागांचे समान वाटप होणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

काय म्हटलंय अग्रलेखात ?

जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले. त्यामुळे 2014 च्या ‘मोदी’ लाटेतही याच मावळय़ांनी किल्ला लढवला व भगवा राखला. हा बाणा आजही शिवसैनिकांनी जपला आहे. तशी परिस्थिती काँगेस किंवा राष्ट्रवादीची आहे काय? मुळात या दोन्ही पक्षांना काही विचार, धोरण आणि दिशा उरली आहे काय? 370 कलम हटवले म्हणून साऱ्या देशात आनंदी आनंद असताना ‘370’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण? त्यामुळे काँग्रेस पक्षालाही गळतीच लागली.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रवादीच्या कावळय़ांनी तेव्हा ही फालतू ‘काव काव’ केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते, पण पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे. आपल्या अस्सल इरसाल कोकणी भाषेत बोलायचे तर ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच आज राष्ट्रवादीची स्थिती आहे. शिवसेना किंवा भाजपात कावळे येत आहेत की मावळे याचा निर्णय आम्ही घेऊच. ‘चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी एक कटुसत्य सांगितले होते. सत्ता आहे म्हणून ‘आयाराम’ म्हणजे ‘इनकमिंग’ वाढले आहे. या ‘आयारामां’त कावळे किती आणि मावळे किती याचाही शोध आम्ही घेतच असतो. वाल्यांचे वाल्मीकी करणारे वॉशिंग मशीन तसे कुणाकडेच नाही. कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळय़ांचे स्वागत होईल.