ऐनवेळी शिवसेनेला धक्का; काँग्रेस आघाडीला बरोबर घेणार?
चाळीसपेक्षाही अधिक नगरसेवकांची जुळवाजुळव केलेल्या शिवसेनेला ऐनवेळी जोरदार धक्का देण्याचे डावपेच भारतीय जनता पक्षाने आखले आहेत. महापौरपदावरच भाजपने दावा सांगितला असून आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही, असे सांगत काँग्रेस आघाडीशी हातमिळवणीचे संकेत दिले आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या गटाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या गटाचे अन्य पदाधिकारी व चार नगरसेवकांची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीनंतर वरील निर्णय जाहीर करण्यात आला. पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा व श्रीकांत साठे, जगन्नाथ निंबाळकर, प्रवक्ते गौतम दीक्षित यांच्यासह सुवेंद्र गांधी, श्रीपाद छिंदम, मालन ढोणे व नंदा साठे असे चार नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.
दीक्षित यांनी या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या बाबतीत शिवसेनेने भाजपशी कोणतीही चर्चा केली नाही. भाजपला गृहीत धरून परस्परच त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी केली असून, स्वत:च वेगळी वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र वेगळी गणिते मांडून शहरात भाजपचा महापौर होऊ शकतो. पक्षाला कोणीही अस्पृश्य नाही. जे कोणी बरोबर येतील, त्यांना बरोबर घेऊन भाजप मनपाची सत्ता मिळवील असे दीक्षित यांनी सांगितले. यंदाचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून, पक्षाकडे चार महिला नगरसेविका आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजपचेही पाच नगरसेवक शिवसेनेच्या सहलीवर गेले असले, तरी पक्षाच्या निर्णयानुसार ते निवडणुकीत पक्षाच्याच बरोबर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केवळ महापौरच नव्हे, तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला-बालकल्याण समिती व मनपातील सभागृह नेतेपदही भाजप स्वत:कडेच राखील, असा दावाही त्यांनी केला. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या दि. १५ ला भाजप दोन्ही पदांसाठी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करील, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

शिवसेनेची भुसारी यांच्याशी चर्चा
महपौरपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने महिन्यापूर्वीच मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या पाच नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी व काही अपक्ष असे तब्बल ४० नगरसेवक सध्या शिवसेनेच्या गाठीला असल्याचे सांगितले जाते. यातील ३५, ३६ मतदान करणारे व काँग्रेस आघाडीचे पाच ते सहा गैरहजर राहणार, अशी त्यांची मोर्चेबांधणी आहे. भाजपने स्थानिक पातळीवर वेगळी भूमिका घेतली असली तरी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री रवींद्र भुसारे यांनी मात्र शुक्रवारीच मुंबईत भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करून महापौरपदासाठी शिवसेनेला हिरवा कंदील दिल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब कोरेगावकर व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शुक्रवारी मुंबईत भुसारे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

जगताप-कोतकर-कर्डिले फॅक्टर?
शहराच्या राजकारणात शिवसेना हे अन्य सर्वच पक्षांचे ‘लक्ष्य’ ठरले आहे. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने पूर्वीच ‘पांढरे निशाण’ फडकावले आहे. मात्र शिवसेनेच्या ताब्यात मनपाची सत्ता जाऊ द्यायची नाही, अशा भूमिकेत ते आहेत, त्यामुळेच भाजपशी जवळीक करून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी ते करू शकतील. दोन्ही काँग्रेसमध्ये जगताप व कोतकर हेच कतेधर्ते आहेत. त्यांना भाजपच्या माळेत गुंफण्याची किमया भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले करू शकतात. शिवाय भाजपचा शहरातील एक गट व जगताप यांच्यातील सख्य लक्षात घेता याच पातळीवर या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते.

‘विचार करू..’
भाजपच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भाजपने काय निर्णय घेतला याची आपल्याला कल्पना नाही. त्यांनी आमच्याशी आत्तापर्यंत संपर्क साधलेला नाही किंवा तशी काही चर्चाही झालेली नाही. त्यांनी काही प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर विचार करू, असे ते म्हणाले.