निसर्गसंपन्न कोकणचा आणि एकूणच कोकणवासी यांचा काळ बनून आलेला विनाशकारी जैतापूर अणुउर्जा प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. या प्रकल्पाला कोकणातून हद्दपार करण्यासाठी शिवसेना आता आरपारच्या लढाईस सज्ज झाली आहे. त्यासाठी कोणते आत्मघातकी पाऊल उचलणार, हे महाराष्ट्राला लवकरच दिसून येईल, असे सूचक वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला स्थानिक जनतेचा विरोध व प्रकल्पाबाबतची विद्यमान स्थिती कथन केली. या वेळी पंतप्रधानांना मी या विषयातील आज नाही परंतु जर हा प्रकल्प दुसऱ्या देशात गेला तर फार मोठी परदेशी गुंतवणूक वाया जाईल, असे स्पष्ट करून या प्रकल्पाचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी हे प्रकरण संबंधित तज्ज्ञ विभागाकडे पाठवीत असल्याचे व त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले.
   आ. साळवी यांनी स्पष्ट केले की, जैतापूर प्रकल्प हा प्रदूषणकारी व भूकंपप्रवण क्षेत्रामुळे संहारक असल्याचा निर्वाळा अनेक तज्ज्ञांनी वारंवार दिला असून जागतिक पातळीवर नाकारलेल्या या अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्र शासनाने स्वार्थासाठी स्वीकारले आहे. परंतु शिवसेनेला स्थानिक व कोकणवासीयांना काळजी आहे. शिवसेना येथील जनतेसाठी ढाल बनून काम करील व हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेनेची आता निर्णायक लढाई सुरू झाली असून सेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगत शिवसेना हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी कोणते पाऊल उचलणार हे समस्त महाराष्ट्राला लवकरच दिसून येईल, असे सूचक वक्तव्यही आ. साळवी यांनी केले.    दरम्यान रत्नागिरी- सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेने या प्रकल्पाप्रकरणी जनतेची पूर्णत: फसवणूक केली आहे. त्यामुळे सेनेने आधी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली असल्याचे आ. राजन साळवी यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले सध्या काहीच काम नसलेल्या आणि जनतेने पूर्ण व दुर्लक्षित केलेल्या मंडळीनी अशी मागणी करणेच राजकारणात अजूनही कार्यरत आहेत हे दाखविण्यासाठी केलेली त्यांची ही केविलवाणी धडपड असल्याचे सांगून, अशांना आपण नाहक मोठे करू इच्छित नाही, असा टोलाही आ. साळवी यांनी माजी खासदार राणे यांना लावला.