मंत्रिपदाच्या बाबतीत पक्षाची अडचण समजून घेतली, पण पालकमंत्री पदाच्या बाबतीत तडजोड सहन करणार नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा अशी आग्रही भूमिका रायगड जिल्हा शिवसेना कार्यकारिणीने मंगळवारी घेतली.

रोहा येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही पक्ष मजबूत केला. पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिले, जिल्ह्यातून तीन आमदार निवडून दिले, मावळचे खासदार निवडून दिले, जिल्हा परिषदेत १८ सदस्य शिवसेनेचे आहेत, ३०० ग्रामपंचायती, ३ नगर पालिका, २ नगरपंचायत शिवसेनेनं जिकल्या, ५ पंचायत समित्यांवर भगवा फडकवला, किमान पालकमंत्रीपद वाटप करताना याचा विचार व्हायला हवा होता. पण तसे झाले नाही अशी भूमिका उपस्थितांनी यावेळी मांडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री होईल असे जाहीर केले. मग रायगड जिल्ह्यात हे सूत्र का पाळले गेले नाही असा सवाल यावेळी त्यांनी केला.

पालकमंत्री कोणी पण द्या पण शिवसेनेचा द्या, याबाबत तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, याबाबत जिल्ह्यातील तीनही आमदार, जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवसात भेट घेतील आणि पक्षाच्या पदाधिकारी यांच्या व्यथा मांडतील, अशी माहिती आमदार भारत गोगावले यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.