News Flash

मैत्री गेली चुलीत हेच भाजपाचे राष्ट्रव्यापी धोरण: शिवसेना

'एनडीए'तील मित्रपक्ष गुलाम किंवा चाटूगिरी करणारे नाही ही भूमिका शिवसेनेने आधी मांडली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारच्या जाहिरातबाजीवर शेकडो कोटी रुपये खर्च होतात. पण चंद्राबाबूंना आंध्रप्रदेशच्या उभारणीसाठी ठरवलेले पैसे मिळत नाही. चंद्राबाबू रिंगण तोडत केंद्र सरकारमधून बाहेर पडले. आता रांग लागेल, असा इशाराच शिवसेनेने मोदी सरकारला दिला आहे. मैत्री गेली चुलीत, सत्ता कशीही मिळवा आणि टिकवा हेच भाजपाचे धोरण असल्याची टीका सेनेने केली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधण्यात आला. त्रिपुरातील विजयाचे ढोल पिटणे सुरु असतानाच तेलगू देसम पक्ष सत्तेतून बाहेर पडला. गेल्या दोन महिन्यांपासून चंद्राबाबू नायडू मोदी सरकारवर ताशेरे ओढत होते. भाजपा सरकार शब्दाला पक्के नसून ते चुना लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे संकेत त्यांनी दिले होते.मात्र, चंद्राबाबू दबावाचे राजकारण करत असल्याचा प्रचार केला गेला. अशा सर्व मंडळीना चंद्राबाबू नायडू यांनी खोटे पाडले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा धक्का असून ‘एनडीए’तील मित्रपक्ष गुलाम किंवा चाटूगिरी करणारे नाही ही भूमिका शिवसेनेने आधी मांडली आणि २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले. शिवसेनेमुळे अनेकांची मरगळ दूर झाली. यानंतर काहींना स्वाभिमानी बाण्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी ‘रालोआ’ला रामराम केला, असे सांगत शिवसेनेने या बंडाचे श्रेय घेतले आहे. भाजपा आंध्रप्रदेशमधील जगमोहन रेड्डी यांच्या वाय.एस. आर काँग्रेसशी युती करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गौप्यस्फोट चंद्राबाबू नायडूंनी केला. मित्रपक्षाला अंधारात ठेवायचे आणि मित्राच्या राजकीय शत्रूशी भविष्यातील राजकारणासाठी हातमिळवणी करायची हे भाजपाचे धोरण आंध्रापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रव्यापी आहे. ‘मैत्री गेली चुलीत, सत्ता कशीही मिळवा आणि टिकवा’ हे भाजपाचे धोरण असल्याची टीका शिवसेनेने केली.

केंद्रातील भाजपा सरकारला तुर्तास धोका नसला तरी पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. २०१९ चे राष्ट्रीय राजकारण बदलण्याची ही नांदी असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. काही राजकीय पक्ष हे ‘हवामानाची दिशा दाखवणाऱ्या’ कोंबड्याप्रमाणे असतात. चंद्राबाबूंना ही हवा नेहमीच समजत असल्याचेही अग्रलेखात नमूद करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 9:06 am

Web Title: shiv sena warning to modi government after chandrababu naidu quit nda
Next Stories
1 महाराष्ट्राची सार्वत्रिक पीछेहाट
2 कृषी क्षेत्रात घसरण
3 आधुनिकतेच्या वाटचालीत महाराष्ट्र अजूनही मागेच!
Just Now!
X