पुढचा मुख्यमंत्री कोण हे शिवसेनेने ठरवावं असं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझं पहिलं कर्तव्य लोकांचं ऐकणं हे आहे. निवडणुकीच्या वेळीच नाही तर शिवसेना कायमच लोकांसोबत आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जे शिवसेनेत येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. मी जनआशीर्वाद यात्रा ही लोकांचे आभार मानण्यासाठी काढली आहे. ज्यांनी मतदान केलं त्यांचे तर मी आभार मानतोच आहे मात्र ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं आहे त्यांची मनं जिंकण्याचं मुख्य आव्हान आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. जन आशीर्वाद यात्रेला कालपासून सुरुवात झाली आज आदित्य ठाकरे धुळ्यात आहेत. या ठिकाणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं असं म्हटलं आहे.

याचवेळी आदित्य ठाकरेंना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जे म्हटले होते की सगळं समसमान असेल त्याची नेमकी व्याख्या काय असं विचारलं असता उद्धवसाहेब आणि अमित शाह यांचं जे ठरलं आहे ते ठरलं आहे त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. गुरुवारी झालेल्या भाषणात त्यांनी नवमहाराष्ट्राची संकल्पना मांडली होती. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हटले की शिक्षणाचा दर्जा बदलण्याची गरज आहे, विकासाची गरज आहे त्या अनुषंगाने मी बोललो होतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहात याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता जे काही आहे ते लोकांनी ठरवायचं आहे. शिवसेना आणि भाजपा यांचं सगळं ठरलं आहे असंही त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे. कोणतंही पद मिळवायचं म्हणून मी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही असं आदित्य ठाकरे यांनी गुरुवारीच स्पष्ट केलं होतं. आता मुख्यमंत्री होणार का ? हे विचारलं असता तो निर्णय लोकांनी घ्यावा असं त्यांनी म्हटलं आहे.