शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. केंद्र सरकार हे राज्याचे पालक असले पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सांगलीतल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या कोमात गेली आहे. ती कुणामुळे कोमात गेली आहे हेदेखील पाहिले पाहिजे असंही ते म्हणाले.

” आमचा संघ चांगलाच उत्तम आहे. संघ म्हणजे टीम, जाऊद्या नको तो वाद ” असं म्हणत त्यांनी संघालाही टोला लगावला. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या मदतीचाही उल्लेख केला. ” शेतकरी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आता ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. सहकार क्षेत्र मरु देणार नाही. मात्र शेतकऱ्यांचं हित हे सर्वात आधी पाहिलं पाहिजे या मताचा मी आहे. 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी देणारच आहोत. मात्र त्यावर ज्यांचं कर्ज आहे त्यांनाही दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“काळजी करु नका, सध्याचं सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं आहे ते सुरु ठेवणार. शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करणार. यावेळी जयंत पाटील यांचंही त्यांनी कौतुक केलं. जयंत पाटील यांनी सांगलीत केलेलं काम उत्तम आहे. जयंतराव तुम्ही सगळे कार्यक्रमच करुन टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचं भाषण मन लावून ऐकतो. जयंत पाटील बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते कौतुक करतात. आपल्याला गुदगुल्याही होतात. मात्र घरी गेल्यावर आणि नीट विचार केल्यावर समजतं की आपले ओरबाडे निघाले आहेत. चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यांसाठीच चांगलं काम करायचं आहे” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.