मराठी भाषकांच्या एकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा

मराठी भाषकांच्या एकीसाठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनासाठी कर्नाटक निवडणुकीत सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगाव येथे आज जाहीर केले. अशीच भूमिका महाराष्ट्रातील अन्य पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. तसेच मराठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावला यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बेळगाव येथील मराठी भाषकांच्या ‘बेळगाव लाइव्ह’ या ‘सोशल मीडिया’च्या पहिला वर्धापन दिन सोहळय़ात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, किरण ठाकूर, उपमहापौर मधुश्री पुजारी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश बिलगोजी आदी या वेळी उपस्थित होते.

सीमाप्रश्नाच्या लढाईत शिवसेनेने मुंबईच्या रस्त्यावर ६५ हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, असा उल्लेख करून राऊत म्हणाले, की आता वेळ आली आहे निवडणुकीने लोकेच्छा दाखवण्याची. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही समितीच्या प्रचारासाठी घेऊन येण्याची तयारी सुरू आहे. सीमाप्रश्नाच्या पाठीशी राहणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनीही असे करण्याची वेळ आली. सीमाभागात राष्ट्रीय पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवू नये ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

सीमाप्रश्नासाठी केवळ निवडणुकांपुरते एकत्र येऊन चालणार नाही. तर अखेरचा भीमटोला देणे आवश्यक आहे. याकरिता शरद पवार किंवा कोणीही नेत्याने नेतृत्व करावे. सीमाप्रश्नासाठी शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे नमूद करून राऊत म्हणाले, की आम्ही पाकिस्तानला नाही तर बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी न्यायालयाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अशी मागणी त्यांनी  केली. बेळगाव आणि अन्य सीमावर्ती भागातील लोकांवर जेव्हा अन्याय होईल, तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळतील. काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही, तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू, असा इशारा त्यांनी दिला.

पवार यांची आज बेळगावमध्ये सभा

कोल्हापूर  : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बेळगाव शहरात उद्या (दि. ३१) जाहीर सभा होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेसाठी काही अटीवर कर्नाटक प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे.  तीन दशकांहून अधिक काळानंतर पवार यांची बेळगाव येथे सभा होत आहे. बेळगाव, कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्न आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पवार या सभेत समितीच्या नेत्यांना आणि मराठी जनतेला काय मार्गदर्शन करणार याकडे सगळय़ांचेच लक्ष लागले आहे. पवार शनिवारी सकाळी दहा वाजता बेळगावला येणार आहेत . दुपारी  त्यांचा शहरातील विविध सहकारी संस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर शहापूरमधील तुकाराम बँकेला धावती भेट देऊन सायंकाळी सभेसाठी ते हजर राहणार आहेत. सीमा लढ्यात योगदान दिलेले ज्येष्ठ सीमा सत्याग्रही कृष्णा मेणसे, वकील राम आपटे आणि किसन येळ्ळूरकर यांचा या वेळी पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली.