News Flash

कोकणात शिवसेनाच, भाजपची पीछेहाट

कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व खेडपुरतेच मर्यादित आहे.

शिवसेनेच्या नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला

 

विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपची पीछेहाट झाली होती ती नगरपालिका निवडणुकांमध्ये कायम राहिली आहे. याशिवाय गेल्या निवडणुकीत यश मिळालेल्या राष्ट्रवादीचे कोकणात पानिपत झाले असून शिवसेनेने कोकणचा गड कायम राखला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पराभवांचा धक्का बसलेल्या नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रभाव पुन्हा वाढला आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील चार नगर परिषदा आणि एक नगर पंचायत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन नगर परिषदा व एक नगर पंचायतींच्या निकाल संमिश्र लागले असले तरी भाजपला कोकणात तेवढे यश मिळालेले नाही. रत्नागिरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळाले. शिवसेनेने ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही आपली स्वतंत्र ताकद आणि वर्चस्व निर्माण केले.

कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व खेडपुरतेच मर्यादित आहे. गेली पाच वष्रे येथे मनसेची सत्ता होती, पण या निवडणुकीद्वारे शिवसेना नगर परिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेच्या वैभव खेडेकर यांनी निसटता विजय मिळवला. चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता; पण विधानसभा निवडणुकीपासून येथील राष्ट्रवादीची ताकद बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. आता चिपळूण नगर परिषदेच्या निवडणूक निकालातून तेथेही या पक्षाची सद्दी संपल्याचे चित्र पुढे आले आहे.

राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपही जिल्ह्य़ातील कोणत्याही नगर परिषदेत दोन आकडी संख्या गाठू शकलेला नाही. या निवडणुका स्वबळावर लढवून सेनेच्या परंपरागत वर्चस्वाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न सपशेल फसला. रत्नागिरीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर या पक्षाचे मावळते नगराध्यक्ष महेंद्र मयेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. चिपळुणात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळालेला विजय ही या पक्षाच्या नेत्यांच्या दृष्टीने एकमेव समाधानाची घटना आहे.

काँग्रेसने देवगड नगर पंचायतीत बहुमत मिळवले पण मालवण आणि वेंगुर्लेमध्ये त्या प्रमाणात यश न मिळाल्यामुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणावर  निर्विवाद पकड निर्माण होऊ शकली नाही. राणेंचे प्रभावक्षेत्र काही प्रमाणात वाढायला मात्र या निकालांमुळे हातभार लागला आहे. रत्नागिरीप्रमाणेच याही जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली असल्याचे या उघड झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:46 am

Web Title: shiv sena win in konkan nagar palika election
Next Stories
1 विदर्भात भाजपचा गड कायम, सेनेचे यश मर्यादितच
2 निवडणूक निकालानंतर विखे-थोरात यांच्यात कलगीतुरा
3 सिंधुदुर्गात राणे-केसरकरांना धक्का
Just Now!
X