सव्वा लाखाच्या फरकाने राष्ट्रवादीचा पराभव

अत्यंत लक्षणीय ठरलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक लढतीत ओम राजेनिंबाळकर यांनी एकतर्फी बाजी मारली आहे. टपाली मतदान वगळता एक लाख २६ हजारांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचा पराभव करीत ओमराजे यांनी विजयश्री हस्तगत केली. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त मदानात असलेल्या १२ उमेदवारांना आपले डिपॉझिटदेखील वाचवता आले नाही. ९७ हजार मतदारांचे समर्थन घेऊनही वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांचीदेखील अनामत रक्कम जप्त झाली. रात्री उशिरापर्यंत टपाल आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी सुरू होती. चौथ्या क्रमांकावर नकारात्मक मतांची सर्वाधिक नऊ हजार ९६१ एवढी नोंद झाली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आणि बार्शी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना चार लाख ६४ हजार २१ मतदारांनी कौल दिला आहे. टपाल मतदान वगळता अंतिम फेरीअखेर सेनेचे राजेिनबाळकर यांनी तब्बल एक लाख २६ हजार ६५१ मतांनी राणा जगजितसिंह पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी ९७ हजार ७४९ मतदारांचे समर्थन घेत झेप घेतली आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक नकारात्मक मतदारांनी आपला कौल दिला आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला एक लाख पाच हजार १८९, तर राष्ट्रवादीला ५१ हजार ६८५ मतदान मिळाले आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघातून राजेनिंबाळकर यांना ८६ हजार ९०२, तर राणा जगजितसिंह पाटील यांना ६७ हजार २२६ मतदारांनी समर्थन दिले आहे. तुळजापूर मतदारसंघातून शिवसेनेला सर्वाधिक एक लाख १० हजार ६० मतदान तर राणा जगजितसिंह पाटील यांना केवळ ८७ हजार ६२० मतांवर समाधान मानावे लागले आहे. उस्मानाबाद विधानसभेतील शिवसेनेला एक लाख तीन हजार १७९, तर राष्ट्रवादीला ९४ हजार ७६७ मतदान मिळाले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात सेनेला ९९ हजार ७०९, तर राष्ट्रवादीला ७७ हजार ९९६ मतदान लाभले आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना मतदारांनी जवळपाससारखे समर्थन दिले आहे. सेनेला ८५ हजार ४५३ तर राष्ट्रवादीला ८४ हजार ५४७ मतदारांनी कौल दिला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० हजारांपेक्षा अधिक मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून वंचित आघाडीला सर्वाधिक २२ हजार ५८ मतदान मिळाले आहे. कर्मचाऱ्यांची आणि सनिकांची अशा एकूण ११ हजार ३४२ टपाल मतांची मोजणी उशिरापर्यंत सुरू होती.

विजयी उमेदवारांचे अभिनंदन

जनतेचा कौल मी नम्रपणे मान्य करतो, पुढील काळात देखील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला मतदान केलेल्या सर्व मतदारांचा मी शतश: ऋणी आहे. तसेच माझ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनेचे नेते, कार्यकत्रे व हितचिंतक यांचा मी मनापासून आभारी आहे.

– राणा जगजितसिंह पाटील

राजेनिंबाळकर, मुंडे यांना श्रद्धांजलीच

उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनी, युवक, वडीलधारी लोकांच्या प्रेमाचा, अपेक्षांचा मी अतिशय नम्रपणे स्वीकार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वाना उस्मानाबादला विकासाच्या नकाशावर आणायचे आहे . या महाविजयासाठी शिवसेना -भाजप -रासप- रिपाइं ( आठवले ) महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकत्रे यांनी अथक मेहनत घेतली त्याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा निकाल आहे. पवन राजे निंबाळकर, गोपीनाथजी मुंडे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे.

– ओम राजेनिंबाळकर