अहवाल सादर केल्यानंतर खर्चापोटी १० हजार मिळणार

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

यंदापासून पदवीदानाचे घोंगडे महाविद्यालयाच्या गळ्यात मारले असून यासाठी दिमाखदार सोहळा आयोजित करण्याच्या सूचना महाविद्यालयांना शिवाजी विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. या सोहळ्याचा अहवाल सादर केल्यानंतर या खर्चापोटी १० हजार रुपये विद्यापीठाकडून दिले जाणार आहेत. हा सोहळा विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा झाल्यापासून एक महिन्याच्या आत उरकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालयातून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. स्नातकांना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भव्य दिव्य सोहळ्यात पदवी प्रदान करण्याचा प्रघात आहे. यासाठी उच्च विद्याविभूषित व्यक्तीला पाचारण करण्यात येते. यंदाचा सोहळा नुकताच विद्यापीठात पार पडला. मात्र महाविद्यालयीन पातळीवर पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवीदार सोहळा महाविद्यालय पातळीवर घेण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.पदवीदान समारंभासाठी मार्गदर्शक सूचनांची जंत्रीही विद्यापीठाकडून पाठविण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख अतिथी पद्यश्री पुरस्काराने सन्मानित झालेली असावी. अशी व्यक्ती उपलब्ध झाली नाही तर शैक्षणिक, संशोधन, सामाजिक, संरक्षण, उद्योग, साहित्य,  कृषी, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी असावी. कार्यक्रमाकरिता विद्यापीठ अधिकार मंडळातील एका सदस्यास आमंत्रित करावे.

समारंभाचा आरंभ प्रवेशद्वारापासून मिरवणुकीने करावा. व्यासपीठाच्या दर्शनी पडद्यावर शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे भव्य छायाचित्र लावण्यात यावे, दर्शनी ठिकाणी विद्यापीठाचे बोधचिन्ह, ध्वज लावावे. मगच खाली संबंधित महाविद्यालयाचे नाव, बोधचिन्ह वापरावे आणि कोणत्याही स्थितीत समारंभाचे पावित्र्य राखावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या समारंभाच्या कार्यक्रमाची चित्रफीत आणि छायाचित्र विद्यापीठाकडे पाठविल्यानंतर या खर्चापोटी १० हजार रुपये देण्यात येतील अशा सूचना देण्यात आल्या असून हा समारंभ कोणत्याही स्थितीत विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा झाल्यानंतर म्हणजे २२ मार्चपर्यंत पार पाडणे आवश्यक आहे असेही सूचनेत म्हटले आहे. यामुळे महाविद्यालय पातळीवर पदवीदान सोहळा आयोजित करण्याबरोबरच विद्यापीठाच्या मार्च अखेरपासून सुरू होण्याच्या सत्र परीक्षांच्या आयोजनाचीही धावपळ सुरू आहे.