राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा चेहरा लोकसभा निवडणुकीतल्या पार्थ पवारच्या पराभवाने काळवंडला आहे, त्यांनी मला शिकवू नये असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी फेसबुक पोस्ट करुन अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ज्याला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही तो माझ्यावर कोणत्या तोंडाने टीका करतोय? असा एकेरी उल्लेखही पाटील यांनी केला आहे.

माझे चुलते हे केंद्रात कृषीमंत्री किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. मी स्वतःच्या हिंमतीवर राजकारणात आलो आहे. माझा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही माझ्या शब्दाला लोक आजही किंमत देतात असेही त्यांनी म्हटले आहे. जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक करायची, खंडणी गोळा करायची आणि नाव माझं घ्यायचं हे प्रकार बंद करा असाही इशारा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे.

पाहा व्हिडिओ

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला. त्यानंतर अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती. पाटील यांचा चेहरा पराभवामुळे काळवंडला असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्याच टीकेला आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

मुलगा पार्थ पवारचा पराभव झाला तर मावळमध्ये फिरकणार नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना त्यांच्या वाक्याचा विसर पडला का?  गेल्या दहा वर्षांपासून अजित पवार त्यांच्याच पक्ष मातीमोल कसा होईल ते पहात आहेत. पार्थ पवारला लोकसभा निवडणुकीत उभं करु नका असा सल्ला शरद पवार यांनी अजित पवारांना दिला होता मात्र यांनी त्यांचं ऐकलं नाही असंही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच दोन ते तीन वेळा अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवारचा पराभव झाला आहे हे मान्य करा ते वास्तव स्वीकारा आणि मग रिंगणात उतरा असाही सल्ला पाटील यांनी अजित पवार यांना दिला.