News Flash

नव्या निर्बंधांनंतर शिवभोजन थाळीबाबतही राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपयेच ठेवण्यात आली आहे. पण त्यासोबतच आता...

संग्रहित छायाचित्र

राज्यात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे अखेर राज्य सरकराने पूर्ण लॉकडाऊन न लागू करता काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळीबाबत देखील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. शिवभोजन थाळी आत्तापर्यंत ५ रुपये प्रतिथाळी दरानेच दिली जात होती. याच किंमतीमध्ये शिवभोजन थाळी पार्सल पद्धतीने उपलब्ध करण्याची सविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. नव्या निर्बंधांनुसार हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण्यावर बंदी घालण्यात आली असून फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीसाठी देखील तसाच निर्णय घेण्यात आला आहे.

 

“करोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्यसरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार” असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

“करोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण करोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे”, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारकडून १० रुपयांत शिवभोजन थाळीची घोषणा केली. त्यानुसार राज्यभरात शिवभोजन केंद्र सुरू देखील करण्यात आली. मात्र, करोना काळात पुन्हा नवं संकट आलं. पण या काळात या थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 8:28 pm

Web Title: shivbhojan thali to be available in parcel announces chhagan bhujbal pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 जनमानसात अस्वस्थता… तत्काळ पावलं उचला; फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
2 दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अनिल देशमुखांचं ट्विट; म्हणाले…
3 उद्धव ठाकरेंच्या मागणीला आनंद महिंद्रांचा पाठिंबा; केलं ट्विट
Just Now!
X