शिवजयंती हा आपला सण आहे, कोणाचा वाढदिवस नाही असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीप्रमाणचे साजरी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक हे उत्सव तिथी आणि तारखेनुसार साजरे करण्यावरुन नेहमी वाद होत असतात. राज ठाकरे रायगड जिल्ह्यात असून शिवप्रेमींनी महाड येथे राज ठाकरे त्यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आमंत्रण दिले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“महाराजांचा जन्म हा आपला सण आहे, तो वाढदिवस नाही कुणाचा. जर तो सण असेल तर तो तिथीलाच येतो, आणि त्यानुसारच साजरा झाला पाहिजे. खरं तर त्यांची जयंती आपण 365 दिवस साजरी करावी”, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

“एके दिवशी मी जयंत साळगावकरांना भेटलो होतो. त्याला जवळपास १५ वर्ष झाली. तेव्हा मी त्यांना शिवजयंती तारखेने की तिथीने साजरी करायची या वादासंबंधी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर तो आपला सण आहे असं सांगितलं होतं”, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

शिवजयंती ३६५ दिवस साजरी केली तरी काही हरकत नाही असं मत यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सण का तिथीने साजरे करता ? दिवाळी गेल्यावर्षी ज्या तारखेली होती त्याच तारखेला यावर्षीही करता का ? असा प्रश्न विचारला.