िहदुत्ववादी संघटनांतर्फे उद्या (बुधवारी) तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात मंगळवारी पोलिसांनी सशस्त्र पथसंचलन केले.
शिवसेनेने जयंतीची जोरदार तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. मिरवणुकांमध्ये युवकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. पोलिसांचे या मिरवणुकांवर खास लक्ष असेल. होळी, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, तरोडा नाका भागातून सकाळी मिरवणुकांना प्रारंभ होईल. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी सर्वच भागात कडेकोट बंदोबस्त तनात आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने आक्षेपार्ह गाणी वाजविण्यात येऊ नयेत, कोणत्या व्यक्तीचा अथवा पक्षाचा प्रचार होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शहराच्या बहुतांश भागात मंगळवारी पथसंचलन करण्यात आले. देगलूर नाका येथून सुरू झालेले पथसंचलन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संपले. पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया यात सहभागी झाले होते.
शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेत्यांना विक्री एक दिवस बंद ठेवण्याचा आदेश पूर्वीच दिला आहे. पोलिसांनीही काही समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. पूर्वी अनुचित प्रकार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या काहींवर पोलिसांची खास नजर असणार आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ कारवाई करा, असे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.