किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली आहे. इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशाराही दिला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी हा इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगी होते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब.”

त्यांच्या याच वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालेला पाहण्यास मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली आहे. मात्र इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर संभाजी भिडे रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी म्हटलं आहे.

११ फेब्रुवारीला इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य असलेली क्लीप व्हायरल झाली. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमातून बरीच टीका झाली. शनिवारी म्हणजेच १६ फेब्रुवारीला इंदुरीकर महाराजांची एक उद्विग्न प्रतिक्रियाही समोर आली. त्यात ते म्हणाले “दोन तासांच्या किर्तनात एखादी चूक होऊ शकते. जो काही वाद सुरु झाला आहे त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. जर हा वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून देईन आणि शेती करेन.”

दरम्यान १८ तारखेला त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. दिलगिरी व्यक्त करणारं एक पत्रच त्यांनी लिहिलं आहे. दरम्यान इतकं सगळं झाल्यानंतरही अंनिसने त्यांची भूमिका मागे घेतलेली नाही. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी अंनिसने केली आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे हे इंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावले आहेत. इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवप्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.