भाजपच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीचा आज समारोप करण्यात आला. दरम्यान, मुंबई मनपा निवडणूक ही शिवसेना-भाजप एकत्र लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना न्याय मिळणार, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपच्या बैठकीत कालचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी युती तोडल्यामुळेच आम्हाला आमची ताकद समजली, असे प्रतिपादन केले होते. तसेच,  राज्यात पुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या कुबडय़ा फेकून देण्यासाठी ‘शत-प्रतिशत भाजप’चा कानमंत्र अध्यक्ष अमित शहा यांनी दिला होता. तर मनासारखे जागावाटप झाले, तरच युती, अन्यथा नाही, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठणकावले होते. त्यामुळे शिवसेनेबरोबरची युतीची वाटचाल जास्त काळ चालणार नसल्याचे दृश्य असतानाचं मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या घोषणेमुळे वेगळेचं चित्र पाहावयास मिळत आहे.