पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. मंगळवारी भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी पक्षाचे नेते ममता बॅनर्जींची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. याआधी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. तसंच तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदार के कविता यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. कविता या तेलंगणाच्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली असून, शिवसेनेने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन जर नवाज शरिफ यांची भेट घेऊ शकतात तर मग ममता बॅनर्जी एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जी एनडीएच्या घटकपक्ष होत्या. कोणीही अस्पृश्य नाहीये, ममता बॅनर्जीदेखील नाहीत. जर ममता बॅनर्जी भाजपासोबत असत्या तर काय जालं असतं. आज भाजपाला ममता बॅनर्जी अस्पृश्य वाटत आहेत. त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत’, असं म्हणत संजय राऊत यांनी भेटीचं समर्थन केलं आहे.

ममता यांनी मंगळवारी नवी दिल्लीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह टीडीपी, टीआरएस आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. भाजपविरुद्ध सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. देशातील सर्व संस्था भाजपच्या संस्था बनत असून भाजपने त्यांचा गैरवापर चालवला आहे, असं ममता म्हणाल्या.

नोटाबंदी, जीएसटी, बँक घोटाळे आदी बाबींमुळे देशातील सामान्य नागरिकांनाही त्रास झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली.