‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून शिवसेनेनं कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाचे लेखक गोयल यांच्याशी पक्षाचा संबंध नाही, असं भाजपानं स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा भाजपाच्या वर्मावर बोट ठेवलं आहे. “आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ”आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!” असं सांगत शिवसेनेनं भाजपावर टीकेचा बाण सोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून महाराष्ट्रात वादाची वावटळ उठली. भाजपावर टीका करण्यात आली. त्यावर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्याशी संबंध नसल्याचं भाजपानं म्हटलं होतं. यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित केला आहे. “महाराष्ट्र सदनावर ज्यांनी हल्ला केला त्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले. सदनावरील हल्ल्यात तेव्हा शिवरायांच्या प्रतिमेसही तडे गेले होते. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ”आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!” आता यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले,” अशा शब्दात शिवसेनेनं भाजपाला सुनावलं आहे.

छत्रपतींच्या वंशजांना चिमटा –

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे व दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत. म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्व गाद्यांचे वारसदार आज भाजपमध्ये आहेत. प्रत्येक गादीबद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्र संतापला असताना शिवरायांच्या वारसदारांनाही आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. छत्रपतींनी मोगलांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ‘स्वराज्य’ स्थापन झाले. त्यांनी चाकरीचा मार्ग स्वीकारला असता तर महाराष्ट्र निर्माण झाला नसता. शिवरायांनी दिल्लीश्वरांच्या मनसबदारीवर लाथ मारली म्हणून ‘मराठी बाणा’ आजही जागा आहे. शिवराय शूर होते व संयमी होते म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केले,” असा चिमटा शिवसेनेनं छत्रपती संभाजीराजे भोसले, उद्यनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांना काढला आहे.