लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं? पोलीसही हप्ते घेतातच ना असं वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली असून त्यांची पाठराखण करताना भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं. गुहागरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भास्कर जाधव यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन संताप व्यक्त करताना म्हटलं की, “पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का?”. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना फक्त दोन गोष्टींसाठी आपल्याला फोन करु नका असंही सांगितलं. “फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे,” असं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका

लॉकडाउनमध्ये अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू सावंत याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दारू देखील जप्त केली होती. याच मुद्द्यावरुन भास्कर जाधव यांनी पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला असून यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “भाजपा नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.