भारतीय जनता पार्टी व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील, असा निर्णय सोमवारी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व प्रकाश जावडेकर, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले की, शिवसेना हा अकाली दलाप्रमाणे भाजपाचा जुना साथीदार आहे. अनेक बऱ्यावाईट प्रसंगात शिवसेना भाजपासोबत राहिला आहे. दोन्ही पक्षांची युती सैद्धांतिक आधारावर आहे. मध्यंतरी काही मतभेद झाले होते पण ते मतभेद दूर झाले असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने लढतील व आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अधिक संख्याबळाने सत्तेवर येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष युती करून लढतील. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपा २५ व शिवसेना २३ जागा लढवेल. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर उरलेल्या जागांपैकी अर्ध्या अर्ध्या जागांवर भाजपा व शिवसेना लढतील. निवडणुकीनंतर राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यावर पदे व जबाबदाऱ्या समान पद्धतीने सांभाळू.

ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी हिताचे अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी निर्णय घेऊ, पीकविमा योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रारनिवारण केंद्र उघडण्यात येईल, नाणार येथील भूमीपूत्रांचा विरोध ध्यानात घेऊन तेथील प्रकल्पासाठीचे भूसंपादन थांबविण्यात येईल व जेथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तेथे रिफायनरीचा प्रकल्प हलविण्यात येईल आणि मुंबईत पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांचा कर माफ करण्यास मान्यता देण्यात येईल. राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जनतेला दिलासा देण्यासाठी भाजपा शिवसेना नेते संयुक्त दौरे करतील.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना व भाजपा एकदिलाने एकत्र आल्यामुळे देश व राज्य मजबूत होईल. युतीच्या निर्णयाचे तमाम हिंदू स्वागत करतील. आमचे हिंदुत्वाचे विचार व धोरण एकच असून खुल्या दिलाने व एकमताने आम्ही पुढे जाऊ.