09 July 2020

News Flash

राज्यातील प्रयोगापूर्वीच नगर तालुक्यात महाआघाडीचा फॉर्म्युला यशस्वी

राज्यातील प्रयोगापूर्वीच महाआघाडीचा हा फॉर्म्युला नगर तालुक्यात यशस्वीपणे राबवला गेल्याचे मानले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

|| मोहनीराज लहाडे

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची संभाव्य महाआघाडी :- राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयोग राबवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. मात्र या तीन पक्षांचा हा महाआघाडीचा फॉर्म्युला यापूर्वीच नगर तालुक्यात यशस्वीपणे राबवला जात आहे. तोही तब्बल बारा वर्षांपासून. राज्य पातळीवर जसे भाजप विरोधात इतर तीन प्रमुख पक्ष एकत्र येत आहेत, तसेच ते नगर तालुक्यात याच सूत्रासाठी बारा वर्षांपूर्वीच एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांच्या तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन हा प्रयोग राबवला आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध या सूत्राखाली नगर तालुक्यात एकत्र आले असले तरी गेल्या १० वर्षांपासून कर्डिले भाजपमध्ये असल्याने भाजपविरोध हेच सूत्र बनले आहे. त्यामुळेच राज्यातील प्रयोगापूर्वीच महाआघाडीचा हा फॉर्म्युला नगर तालुक्यात यशस्वीपणे राबवला गेल्याचे मानले जाते.

नगर तालुक्यातील या प्रयोगाचे सूत्रधार आहेत काँग्रेसचे माजी खासदार दादा पाटील शेळके व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे. माजी आमदार कर्डिले साधारण पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नगर तालुक्यावर त्यांचेच वर्चस्व होते. नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असतानाही सन २००७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्डिले यांनी तालुक्यातील एकही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता. त्यातूनच दादा पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक संपत म्हस्के आदींनी शिवसेनेचे गाडे यांच्याशी संपर्क साधून कर्डिले यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली. त्या वेळी तालुक्यातील या आघाडीसमवेत त्यावेळचा भाजपही होता. या तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादी पर्यायाने कर्डिले यांच्याविरोधात महाआघाडी तयार उभारली.

याच निवडणुकीच्या प्रचारात तालुक्यातील रुईछत्तीशी या गावात भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे एकत्रित छायाचित्र प्रचार फलकावर झळकले होते. या छायाचित्राने मोठा गहजब निर्माण केला होता.

दादा पाटील थोरात गटाचे मानले जातात. कर्जतहून परतताना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या एकत्रित छायाचित्राबद्दल दादा पाटील यांच्याकडे विचारणाही केली. मात्र त्यांनी या आघाडीला थोरात यांच्याकडून मान्यता मिळवली. याच निवडणुकीत शिवसेनेने कर्डिले यांच्या ताब्यातील पंचायत समितीची सत्ता तर हिसकालीच शिवाय जिल्हा परिषदेच्या गटातही चांगले यश मिळवले.

नंतर सन २००९ मध्ये कर्डिले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील या महाआघाडीतून भाजप बाहेर पडला व राष्ट्रवादी त्यात सहभागी झाली. त्यानंतर झालेल्या निवडणूकीतुन महाआघाडीने पंचायत समितीत सत्ता कायम राखली ती आजतगायत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटांतही चांगले यश मिळवले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत परिस्थितीनुसार फाटाफूट झाली तरी तालुक्यातील सर्व निवडणुका या महाआघाडीने कर्डिले यांच्या पर्यायाने भाजपच्या विरोधात एकत्रितपणे लढवल्या. राज्य किंवा जिल्हा पातळीवर पक्षांनी काही निर्णय घेतले तरी तालुक्यात महाआघाडी स्थानिक निवडणुकांसाठी एकत्रच राहिली आहे. सध्या या महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस यांच्याशिवाय राष्ट्रवादीतील एक गट सहभागी आहे. राष्ट्रवादीमधील हा गट ‘सोधा पक्षा’च्या विरोधात सक्रिय आहे. या महाआघाडीने कर्डिले यांची काही सत्तास्थानेही हिसकावली आहेत.

तालुक्याप्रमाणेच राज्यातही फॉर्म्युला यशस्वी होईल

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीचा प्रयोग राज्यात होऊ घातला असला तरी तो गेल्या दहा वर्षांपासून नगर तालुक्यात यशस्वीपणे राबवला गेला आहे. नगर तालुक्याप्रमाणेच राज्यातही हा फॉर्म्युला यशस्वी होईल. त्यामुळे तालुक्यातील प्रयोगाचीच पुनरावृत्ती राज्य पातळीवर होते आहे. तालुक्यात यापुढेही महाआघाडी कार्यरत राहील. -बाळासाहेब हराळ, काँग्रेस, माजी जिल्हा परिषद सदस्य

महाआघाडीमुळेच बळ मिळाले

नगर तालुक्यातील महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमधील एक गट आहे. ही महाआघाडी अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र आली आहे. राज्य पातळीवर हा प्रयोग होऊ घातला असला तरी तालुक्यात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या महाआघाडीच्या माध्यमातूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. -संदेश कार्ले, शिवसेना, जिल्हा परिषद सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 3:04 am

Web Title: shivsena bjp congress akp 94
Next Stories
1 काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची ठाकरे, पवार यांच्याशी चर्चा
2 शेतकऱ्याची आत्महत्या, मृतदेह जिल्हा कचेरीवर
3 विविध प्रयोगांनी मळा ‘फुल’ला!
Just Now!
X