नितीन गडकरी यांची प्रखर टीका

नागपूर : शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेला हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवत राज्यात केवळ सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केली आहे. हे विचारांचे नव्हेतर मतलबाचे राजकारण आहे. अशी युती फार काळ टिकत नसल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनासह महाविकास आघाडीवर टीका केली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ मांढळ येथे शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेत माजी आमदार सुधीर पारवे, अरविंद गजभिये, श्यामबाबू दुबे, सुनील जुवाल, विनोद इटकेलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा कौल सांगणारी ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढलो. भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी विचारधारेशी विश्वासघात केला. सत्तेसाठी सर्व संधीसाधू एकत्र आले आहेत. ज्या काँग्रेसने शिवसेनेला कधी जवळ केले नाही. ते आज गळ्यात गळे घालून फि रत आहेत.अशा प्रकारची अनैसर्गिक युती जनता कधीच पसंत करीत नाही, असा राज्याचा इतिहास आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार हा केवळ नावापुरता राहिला असून ती काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. ही अभद्र युती संपवायची असेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करून महाविकास आघाडीला पराभूत करा, असे आवाहन त्यांनी केले. युती सरकारच्या सार्वजानिक बांधकाम मंत्र्यांनी उमरेड तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लावली होती. ज्या भागात रस्ते नव्हते, त्या भागात आज सिमेंटचे रस्ते झाले आहे, असे ते म्हणाले.