भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधलं. खडसें यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचधर्तीवर पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात येत आहेत, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुण्यात विचारण्यात आला.

मला पंकजा मुंडेंविषयी फार माहिती नाही. आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिली नाही. त्यांना अशाप्रकारची ऑफर फक्त उद्धव ठाकरेचं देऊ शकतात, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापाला संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना संजय राऊत यांमी आपल्या शैलीत उत्तरे दिली.

यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रश्न विचारला. यावेळी बोलतानासंजय राऊत म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’

पंकजा मुंडे या काही महिन्यांपासून भाजपावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षापासून काहीसा दूरावा साधला होता. विधान परिषदेवर डावण्यात आल्यानंही त्यांची नाराजी दिसून आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

आणखी वाचा- उर्मिला मातोंडकरांनी आमची विधान परिषदेची ऑफर नाकारली; काँग्रेसचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक, म्हणाले…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात घेतलेली भूमिका लोकशाहीत बसत नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
“देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

आणखी वाचा- …तर त्यांना अटक करून १० वर्षांसाठी अंदमानात पाठवावे – संजय राऊत

पुणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू – संजय राऊत
“महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.