बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून ‘तेज’ घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या अग्रलेखातून बाळासाहेबांचे राजकीय विचार मांडण्यात आले आहेत. बाळासाहेबांचा राजकीय विचार सांगताना भाजपालाही टोले लगावले आहेत. आज देशाचे राजकारण सर्वार्थाने प्रांतीय पक्षांच्याच हातात गेले आहे व भाजपसारखे, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्षही याच प्रांतीय पक्षांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची वाढवत आहेत. भाजपही ज्या आघाडीचे नेतृत्व करीत आहे त्यातील सर्वच पक्ष हे प्रांतीय आहेत. या प्रांतीय पक्षांना गिळून ढेकर द्यायचे प्रयोग अपयशी ठरले तेव्हा त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

– कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकशिवाय अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्यांच्या शब्दांत धार होती. विचारांत आग होती. चालण्यात सिंहाचा डौल होता. त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला व मनगटात निखारे पेरले. त्यांनी सत्तेचा सारीपाट मांडला नाही. बुद्धिबळाची प्यादी हलवली नाहीत. ते सरळसोट होते. त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात.

– शिवसेनाप्रमुखांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही. आजचा दिवस खास आहे. बाळासाहेबांचा 93 वा जन्मदिवस आज नेहमीच्याच थाटात साजरा होत आहे. शतके बदलतील, पिढय़ा बदलतील, पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहील. यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब जन्मतःच सोबत घेऊन आले. बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून ‘तेज’ घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही. शिवसेनाप्रमुखांनी गांडुगिरीचा हा किडा संघटनेत वळवळू दिला नाही. म्हणून लढा भूमिपुत्रांचा असो नाहीतर हिंदुत्व रक्षणाचा, मर्दांच्या सेनापतीप्रमाणेच बाळासाहेब वावरले. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाली. हा लढा घटनेच्या चौकटीत राहूनच त्यांनी सुरू केला. भाषावर प्रांतरचना घटनेनुसार झाली. त्याप्रमाणे इतर भाषकांना त्यांची राज्ये मिळाली. महाराष्ट्राला मात्र द्विभाषिक रेडय़ाचे लोढणे मिळाले. पुन्हा मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क नाकारला गेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा यासाठी मराठीजनांना लढा द्यावा लागला. पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या.

– १०५ हुतात्मे द्यावे लागले. त्याच मुंबईत नोकरी-धंद्यात मराठी माणसाला सतत डावलण्यात आले. त्या वेदनेच्या ठिणगीतून शिवसेना जन्मास आली ती बाळासाहेबांचे तेज अंगी बाणवून. ‘ठाकरे देश तोडायला निघाले आहेत. जातीयता आणि प्रांतीयतेचे विष पसरवत आहेत. येथे प्रांतीय पक्षांना स्थान नाही.’ असे बोंबलणाऱ्यांत काँग्रेसचे व समाजवाद्यांचे बोंबले सगळय़ात पुढे होते. भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यात हक्क मागणे हा गुन्हा ठरवण्यात आला, पण तोच गुन्हा पुढे राष्ट्रीय विचार बनून देशाच्या राजकीय आकाशात विजेप्रमाणे चमकत राहिला. प्रांतीय पक्ष म्हणून शिवसेना महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या राजकीय क्षितिजावर तळपत राहिली. आज देशाचे राजकारण सर्वार्थाने प्रांतीय पक्षांच्याच हातात गेले आहे व भाजपसारखे, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्षही याच प्रांतीय पक्षांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची वाढवत आहेत. काल-परवा ममतांच्या प. बंगालात 22 भाजपविरोधकांचा मेळावा झाला. हे सर्वच पक्ष प्रांतीय होते. भाजपही ज्या आघाडीचे नेतृत्व करीत आहे त्यातील सर्वच पक्ष हे प्रांतीय आहेत. या प्रांतीय पक्षांना गिळून ढेकर द्यायचे प्रयोग अपयशी ठरले तेव्हा त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे राज्य येताच मुख्यमंत्री कमलनाथ महाशयांनी तेथील भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचा कायदा केला.

– हा विचार बाळासाहेबांचाच होता. बाळासाहेबांनी जे पेरले ते नुसते उगवले नाही, तर टिकून राहिले. शिवसेनेचा विचार हीच शेवटी देशाच्या राजकारणाची दिशा ठरली. हिंदुत्वच देशाला तारेल हा शिवसेनाप्रमुखांचा विचार. त्याच हिंदुत्वाने भाजपसारख्या पक्षांना दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान केले. पण सिंहासनावर बसताच सिंहाची आयाळ झडू लागली व हिंदुत्व उघडे बोडके झाले. आता तर हिंदुत्वाचे मुसळ हिंदुत्ववाद्यांनीच केरात टाकले. अशा वेळी बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व आम्हाला मार्ग दाखवते. देशाला दिशा नाही व विचारांची दशा झाली. देशाला आज मर्दांचे राज्य हवे आहे. त्या मर्दानगीतच राष्ट्रीयत्व आहे. आजही पाकिस्तान सीमेवर धडका मारीत आहे. कश्मीरात सैनिकांचे बलिदान सुरूच आहे आणि आपण ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’चे श्रेय घेत प्रचारकी जोश दाखवत आहोत. कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकशिवाय अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्यांच्या शब्दांत धार होती. विचारांत आग होती. चालण्यात सिंहाचा डौल होता. त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला व मनगटात निखारे पेरले. त्यांनी सत्तेचा सारीपाट मांडला नाही. बुद्धिबळाची प्यादी हलवली नाहीत. ते सरळसोट होते. त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात.