महाविकासआघाडीच्या सरकारचं आज खातेवाटप होण्याची शक्यता आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं यावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते दिल्लीत गेले असून खातेवाटपासंबंधित चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे. मंत्रिमंडळाची दुपारी ३ वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटपात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

१६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याची माहिती आहे. खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागू शकतो.

महाविकास आघाडीचा मंत्रिपदाच्या वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत खातेवाटप जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. “बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, या सर्वातून आम्ही आता मोकळे झालो आहोत, त्यामुळे यापुढील काम वेगाने करु. खातेवाटपही एक दोन दिवसांत करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

तिन्ही पक्षातील ‘हे’ नेते आहेत स्पर्धेत

शिवसेना –
एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादी –
धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.

काँग्रेस –
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार.