मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसंच काही सुरक्षा रक्षक जे या चहावाल्याच्या स्टॉलवर गेले होते त्यांना पूर्वकाळजी म्हणून अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी मातोश्री परिसरात करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्याऐवजी मातोश्रीमधून सर्व कारभार सांभाळत आहेत. सोमवारी मातोश्री परिसरात असलेल्या चहावाल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मातोश्री परिसरात महापालिकेकडून हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला असून तसे पोस्टर परिसरात लावण्यात आले आहेत.

दरम्यान मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले. मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत.

सोमवापर्यंत मुंबईत २२६ परिसर प्रतिबंधित करण्यात आले. अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्ण तपासणीसाठी विशेष दवाखाने सुरू करण्यात आले असून सोमवारी तुळशी वाडी ताडदेव, मालाड, शीव, शिवाजी नगर, देवनार अशा दहा ठिकाणी आणखी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे पथक नेमण्यात आले आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य पथकातर्फे १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ८६८ झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठण्यात आलेलं आहे.