सरकार आणण्यात शरद पवार यांचा चमत्कार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करताना तुम्ही ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतलं, त्याप्रमाणे शरद पवारांसोबत आम्ही कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करुन दाखवला असल्याचं म्हटलं. “जागा जास्त आहे, आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करु शकतो हे दाखवून दिलं आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला लगावला.

शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होता कामा नये
“सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले आहेत,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना लहानपणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. “आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. ऊसाची गुऱ्हाळं नाक्यावर असायची. ऊनात गार ऊसाचा रस पिऊन बरं वाटायचं. पण गुऱ्हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसऱ्या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचं लक्ष नसायचं. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर आम्ही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही,”

आणखी वाचा – शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होता कामा नये – उद्धव ठाकरे

दोन लाखांच्या पुढील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा विचार
आमचं सरकारच्या येताच महिन्याभरात अनेक बैठका झाल्या. यातून आम्ही आता दोन लाखांपर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांचा देखील विचार सरकार करीत असून जे नियमित कर्ज फेडतात, त्यांच्यासाठी देखील योजना आणणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा अस्त्तिवात आणल्याशिवाय राहणारच नाही असं आश्वासन दिलं.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्या
गेल्या सरकारमध्ये आम्ही अर्धवट होतो…म्हणजे अर्धी भूमिका होती. उगाच शब्दाचा अर्थ काहीतरी लागू नये यासाठी खुलासा करावा लागतो. आधीच्या सरकारचे निर्णय म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात होता. त्याला फोडणी कोण देणार ? अशी टीका करताना उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात उघडण्यासाठी पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ अशी घोषणा केली. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आगामी काळात या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमणार असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.