लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी शाळेच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं की, “शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे”.

“काही जणांचं म्हणणं होतं ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट पद्धतीने नको असं मी स्पष्ट सांगितलं. वर्गाशिवाय शाळा सुरु कऱण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी मी अनेक तज्ञांशी बोलत आहे. ऑनलाइन शिक्षण मोठं आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न सुरु आहे”,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.