२५ तारखेच्या आसपास महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल असा दावा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. एवढंच नाही शुक्रवारी होणाऱ्या बैठकीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बोलवण्यात आलं आहे. तसंच पाच सहा दिवस राहण्याच्या तयारीने या असाही निरोप मातोश्रीवरुन आला आहे असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं सरकार लवकरच महाराष्ट्रात स्थापन होईल असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं आपल्याला वाटत असल्याचंही ते म्हणाले. आम्ही भाजपाकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं. मात्र भाजपाने आम्हाला ते नाकारलं. त्यामुळे हा सगळा पेच निर्माण झाला. आता शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेच हे संकेत आहेत असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेलं सरकार येईल आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असाही विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचमुळे महाराष्ट्रात २५ तारखेच्या आसपास जेव्हा सरकार स्थापन केलं जाईल आणि त्यानंतर कॅबिनेटची जी बैठक बोलवली जाईल त्या बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल असाही विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

२१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यानंतर २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात महायुतीला कौल मिळाला खरा मात्र शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे ही मागणी लावून धरली. तर असं काहीही ठरलं नव्हतं म्हणत भाजपाने ही मागणी नाकारली. अखेर या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आणि महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येईल अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आहे तरीही ही चर्चा कायम आहे. कारण बंद दाराआड शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची खलबतं सुरु आहेत.

अशात आज अब्दुल सत्तार यांनीही ही माहिती दिली आहे की आमदारांना आधार कार्ड किंवा पॅनकार्ड घेऊन आणि पाच दिवसांच्या मुक्कामाच्या दृष्टीने बोलावलं आहे. सरकार स्थापन होणार आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्षे खुर्चीवर बसणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.