राज्यात करोनासारखं संकट घोंगावत असताना विधान परिषद निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय पेच निर्माण झाल्यानं अखेर केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर आता राजकारणाला धुमारे फुटू लागले असून, कुरबुरी आणि कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसनं दोन जागांचा हट्ट सोडल्यानंतर शिवसेनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर “आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयासाठी लागणारा आकडा आहे,’ असे या फाकड्यांनी जाहीर केले,” अशी टीका भाजपावर केली आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडं मोठं संख्याबळ असलेल्या भाजपानंही चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, काँग्रेसनं दोन उमेदवार जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत अस्वस्था निर्माण झाली होती. मात्र, दुपारनंतर हा वाद निकाली निघाला. या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत करताना भाजपाला खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाली शिवसेना?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. कायद्यानुसार त्यांना सहा महिन्यांत विधिमंडळाच्या एखाद्या सभागृहात निवडून येणे गरजेचे आहे. मात्र, हे कोरोनाचे संकट अचानक उद्भवले व ठरलेल्या विधान परिषद निवडणुका झाल्याच नाहीत. राज्यपालनियुक्त म्हणून तात्पुरते सदस्य व्हावे तर राज्यपालांना ‘वरचा’ आदेश नसल्याने तेथेही घटनेचे घोंगडे भिजत पडले. शेवटी पंतप्रधानांशी चर्चा करून रखडलेल्या विधान परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा केला गेला, पण ‘कोरोना’ काळात या निवडणुका बिनविरोध होतील काय? यावर काँग्रेसच्या भूमिकेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण काँग्रेसने ‘दहावा’ उमेदवार दिल्याने निवडणुकीचे थंड पडलेले पडघम वाजवायला मदत झाली होती. आता त्यांनी निर्णय बदलला, दोनऐवजी एकच उमेदवार उभा करायचे ठरवले. त्यामुळे विनाकारण उद्भवणारा वाद आधीच शांत झाला. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार आहेत. त्यांचे तीन उमेदवार प्रत्येकी २९ मतांच्या गणितानुसार सहज निवडून येतील, पण त्यांनी चार उमेदवार रिंगणात उतरवले. ‘आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयासाठी लागणारा आकडा आहे,’ असे या फाकड्यांनी जाहीर केले. आता हा आकडा ते कोठून
व कसा लावणार ते त्यांनाच माहीत, पण निवडणुकांचा घोडेबाजार करायचा व त्यासाठी जनतेला ओझ्याचे गाढव करायचे हे एकदा पक्के केल्यावर अशा सोयीच्या राजकारणास ‘दूरदृष्टी’ वगैरे ठरवून मोकळे व्हायचे इतकेच आपल्या हातात आहे,” असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.
लोकांनी कडीकुलूपात घरी बसायचं आणि आमदारांनी…
“महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वीस हजारांवर पोहोचली आहे. चारशेच्या आसपास लोकांचे मृत्यू झाले आहेत. लोक संकटात आहेत. धोका वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपर्यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसले नसते. यात जीवाचा धोका तर होताच, मात्र लोकांना काय तोंड द्यायचे हा प्रश्नसुद्धा होताच. लोकांनी कामधंदे सोडून कडीकुलूपात घरी बसायचे आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचे, असे घडणे योग्य नव्हते. पण सत्तेच्या राजकारणात राजकीय अटीतटीचे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावर सामोपचाराने मार्ग निघाला तर सगळे सुरळीत होते. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक ही घोडेबाजाराच्या वळणाने न जाता सामोपचाराच्या मार्गाने आता जाईल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 7:32 am