शिवसेनेशी युतीबाबत चर्चा सुरू आहे, ही चर्चा निवडणूकीतील उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत सुरू राहणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आमचा हात पुढेच आहे. हा हात हातात घ्यायचा की नाही हा निर्णय शिवसेनेचा असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज जालना येथे झाली. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. राज्यत आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना आमच्यासोबत सहभागी आहे. सत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यांनी कुठल्याही कामाला विरोध केला नाही. यामुळे युतीची अपेक्षा असल्याचे दानवे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुंबई येथील कार्यक्रमातील भाषण प्रसार माध्यमांनी तोडून मोडून प्रकाशित केले असल्याचे दानवे म्हणाले. देशात आणि राज्यात कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या झाल्या तरी भाजपा संघटनाच्या बळावर लोकसभेत पुन्हा निवडून येईल आणि पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची वर्णी लागेल. राज्यात 48 पैकी ४६ मतदारसंघाचा दौरा केला आहे, त्या सर्व मतदार संघात भाजपाचे संघटन मजबूत असल्याचा दावा यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीस आमदार, खासदारसह राज्यभरातून अकराशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. गेल्या बैठकीत झालेल्या ठरावाविषयी या कार्यक्रमाविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठवाड्याच्या विकासावर राज्य व केंद्रने काय भूमिका  घेतली त्याची मांडणी बैठकीत करण्यात आली.