अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी करत उत्तर दिलं.

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. यंदा करोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा हा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले,”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

राज्यपालांनाही टोला

मंदिरं खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत टोला लगावला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.