राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही केंद्राकडे थकीत असलेल्या जीएसटी भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याविषयावर चर्चेसाठी समोर येण्याचं आवाहनही केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक मागणीही केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”अतिवृष्टी भागात गेलो होतो. शेतकऱ्यांची घरंदारं ओसांड झाली आहेत. जमीन वाहून गेली आहे. विहीर बुजल्या आहेत. रस्ते वाहून गेले आहेत. मदत करायची आहे, मदत करतोय. पण मदत करताना सुद्धा पैसे आणायचे कुठून? कारण आपल्या हक्काचा जीएसटीचा टॅक्स त्याचे जवळपास ४८ हजार कोटी आणि वरचे १० हजार कोटी असे ३८ हजार कोटी आपल्या हक्काचे केंद्राकडे बाकी आहेत. ते देत नाहीत आणि बिहारला फुकट लस देतायेत. कुणाच्या पैशातून देतायेत? मग मध्येच प्रस्ताव असा आला की, राज्यांनी कर्ज उभारावं. मग आता म्हणतात केंद्रच कर्ज उभारेल. फेडायचं कुणी? का म्हणून तुम्ही कर्ज उचलत आहात आणि आम्हाला उचलायला लावत आहात,” अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

“कर गोळा करण्याचा जो अधिकार आमच्याकडे होता. त्यावेळीही शिवसेना जीएसटीला विरोध करत होती. इथला पैसा दिल्लीत जाणार, मग दिल्ली सगळीकडे वाटणार. पैसा येत नाहीये. जीएसटी जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी या व्यासपीठावरून आवाहन करतोय की, पुढे या यावर चर्चा करूया. जीएसटीची जी काही कर पद्धत आहे, ती जर फसली असेल आणि मला वाटतं ती फसली आहे. आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये. पत्रावर पत्र दिली जात आहेत. त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. ते जर पैसे मिळत नसतील. ही जीएसटीची पद्धत जर फसलेली असेल, तर मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे, नाही तर पुन्हा जुन्या करप्रणालीवर जाण्याची गरज असेल, तर तसं त्यांनी केलं पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.