भाजपाचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मे रोजी पालघरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे पालघर जिह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपावर कुरघोडी करण्यासाठी शिवसेना ही पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घोषणा शिवसेनेकडून होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा करु शकतात, अशी शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे.

या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावतील. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. ही पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार आहे. 10 मे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. पालघर जिह्यात शिवसेनेसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला दणदणीत यश मिळाले आहे.

काँग्रेसतर्फे हायकमांडला माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत , माजी खासदार दामू शिंगडा आणि नवा चेहरा म्हणून मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त मधुकर चौधरी या तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यातून एकाच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पत्रकार परिषदेव्दारे अथवा पत्रकाव्दारे करण्याची शक्यता आहे.

बहुजन विकास आघाडी, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजपा व किसान सभा यांच्याकडून पाच उमेदवार पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतील, असे चित्र सध्या तरी आहे.