नारायण राणेंना हॅटट्रिक चुकवायची चुकवायची असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवू नये असा टोला शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांचा मुलगा नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. याच पार्श्वभुमीवर दीपक केसरकर यांनी ही टीका केली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. तर वांद्रे येथे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी राणेंना पराभवाची धूळ चारली होती. “नारायण राणे यांचा दोनवेळा पराभव झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. तसंच वांद्रेमधील पोटनिवडणुकीतही ते हारले. त्यामुळे आता हॅट्ट्रिक चुकवायची असेल, तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवू नये”, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांचा विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला. शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे एक तरूण तडफदार आहेत. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असल्याने ते निवडून येतील असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी नारायण राणेंना सिंधुदुर्गाच्या इतिहासाची आठवण करुन दिली. सिंधुदुर्गात एकदा पराभव झाला तर तो नेता कितीही मोठा असला तरी निवडून येत नाही. त्यामुळे नारायण राणेंनी उगाच धोका पत्करु नये असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.