शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अहमदनगरमधील हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. अहमदनगरमधील केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदतही जाहीर केली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला होता. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या हत्याकांडानंतर जमावानं दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे केडगावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा संताप
शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सोबतच महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची कायदाव्यवस्था बिहारपेक्षा वाईट झाली असल्यासारखं वाटत आहे. आमदार कार्डिले यांना गांभीर्याने अटक करणं गरजेचं होतं. अटक झाली मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला यावरुनही संताप व्यक्त केला आहे. तसंच नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असा इशाराही त्यांनी दिला. गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही असा टोला यावेळी त्यांनी भाजपाला मारला.

उद्या वेळ आली आणि कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देताना देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे अशी टीकाही त्यांनी केली. राज्याला वेगळा गृहमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करताना शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत यावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उज्ज्वल निकम यांनी ही केस घ्यावी अशी कुटुंबियांची इच्छा असून आपण त्यांना संपर्क करुन विनंती केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच गुन्हेगारांना कोणतीही दया माया दाखवू नये. मारेकरी फासावर लटकलेच पाहिजेच, मग तो सत्ताधारी पक्षातला का असेना. सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेतच अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. शिवाय हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात असंही म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, शिवसैनिकांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यांना संपूर्ण आधार देऊ. मुख्यमंत्र्यांना अधिकार असेल तर त्यांनी आपला अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर लटकावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सोबतच उद्या एखाद्या गुंडाला ठेचून काढला तर मग ती आमची जबाबदारी नाही असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र एका विचित्र वातावरणातून सध्या चालत आहे. आपण एकत्र येऊन ही गुंडागर्दी मोडली पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केलं.