वसंत मुंडे

नगरपालिकेसह अनेक संस्था सेनेच्या खात्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर बुधवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यतील राजकीय गणिते आता झपाटय़ाने बदलणार आहेत. पुतणे संदीप यांच्या बंडाला पक्षातीलच नेत्यांनी खतपाणी घातल्याने अस्वस्थ क्षीरसागरांनी लोकसभा निवडणुकीतच  महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राजकीय मार्ग बदलला. पहिल्यांदाच संस्थानिक नेता मिळाल्याने नगरपालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था सेनेच्या खात्यावर जमा होत आहेत. क्षीरसागरांचा जिल्हाभर राजकीय प्रभाव असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अच्छे दिन येतील असे चित्र आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि क्षीरसागर युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्यात किती यशस्वी होतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

बीड जिल्ह्यतील काँग्रेस पक्षाच्या स्व.केशरबाई क्षीरसागर यांनी तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करून राजकारणात आपली पकड मजबूत केली. शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभर प्रभाव असलेले क्षीरसागर हे एकमेव मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: क्षीरसागरांच्या घरी जाऊन त्यांना सोबत ठेवले होते. आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा मंत्रीही राहिले. मात्र पक्षांतर्गत गटबाजीत पालकमंत्री असतानाही त्यांना एका मतदारसंघापुरतेच मर्यादित करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची घुसमट सुरुच होती. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेतही क्षीरसागरांनी आपली जागा कायम राखली. पण दोन वषार्ंपूर्वी नगरपालिका निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या बंडाला पक्षाच्याच नेत्यांनी खतपाणी घातल्यामुळे क्षीरसागरांची अस्वस्थता वाढली. पक्षात नव्याने आलेल्या धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे जिल्ह्यतील पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे गेल्याने क्षीरसागरांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त राहणे पसंत केले. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत क्षीरसागरांनी भाजपचे सुरेश धस यांना मदत करण्याची भूमिका घेऊन आपला मार्ग बदलला होता. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना पाठिंबा देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांनी आता राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

क्षीरसागर यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर ३० वर्षांपासून नगरपालिकेत अध्यक्ष असल्याने पालिका शिवसेनेच्या खात्यावर जमा झाली आहे. तर बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दूध संघ यांसह बहुतांश सहकारी संस्था क्षीरसागरांकडे आहेत. तर शिक्षण संस्थांच्या माध्यमातून क्षीरसागरांचा सर्वत्रच हक्काचा संपर्क असल्याने शिवसेनेला आगामी काळात याचा चांगला फायदा होणार आहे. भाजप-सेना युतीत सुरुवातीला सेनेकडे बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव हे मतदारसंघ होते. मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड वगळता इतर मतदारसंघ भाजपकडे घेतल्याने सेनेकडे एकच मतदारसंघ राहिला. सुरुवातीला शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले यांनी दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. तर प्रा. सुनील धांडे यांनीही एकवेळा प्रतिनिधित्व केले. मात्र दिवंगत मुंडे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे जिल्ह्यत शिवसेनेला संधी मिळाली नाही. दोन वषार्ंपूर्वी गेवराई मतदारसंघातील क्षीरसागरांचे समर्थक माजी मंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषदेत चार सदस्य सेनेचे निवडून आल्याने युधाजित पंडित हे बांधकाम सभापती आहेत. क्षीरसागरांचा बीडसह गेवराई, माजलगाव, केज या मतदारसंघात प्रभाव असल्याने शिवसेनेला भविष्यात राजकीय बळ मिळणार आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे या प्रमुख नेत्या असल्याने क्षीरसागरांनी जाणीवपूर्वक शिवसेनेत प्रवेश केल्याने आता क्षीरसागर-मुंडे हे युतीच्या माध्यमातून जिल्ह्यत राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करतील. विधानसभेच्या बीड मतदारसंघात शिवसेनेचा हक्काचा ३० हजार मतदार मानला जातो. क्षीरसागरांचा ओबीसी प्रवर्गात आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून असलेला संपर्क दांडगा आहे.