News Flash

करोनाच्या दणक्यामुळे एसटीचा दरमहा तोटा ५० कोटींवरून थेट ३५० कोटींवर!

परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

करोनाच्या दणक्यामुळे एसटीचा दरमहा तोटा ५० कोटींवरून थेट ३५० कोटींवर!
(संग्रहित छायाचित्र)

कोविडच्या संकटातून बाहेर पडताना, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून उपलब्ध साधनसामग्रीचा महत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

“कोविडच्यापूर्वी दरमहा सुमारे ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एसटीला कोविडच्या काळात तब्बल पाच महिने मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात सेवा बंद ठेवावी लागली. या काळात दररोज सरासरी २२ कोटी रुपये याप्रमाणे तब्बल सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या महसूल एसटीला गमवावा लागला. दुर्दैवाने त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या आर्थिक स्थितीवरही झाला. त्यामुळे आता दरमहा ५० कोटी रुपयांचा तोटा हा सध्या ३५० कोटी रुपये पर्यंत पोहोचला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“कोविडच्या काळामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार, लाखो मजुरांची वाहतूक, अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय कर्मचारी, सफाई कामगार अशा कोविडयोध्दयांचे सारथ्य, ऊस तोडणी कामगार, परराज्यात असणारे विद्यार्थी, यांची वाहतूक, तसेच अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक करण्यासाठी एसटीने शर्थीचे प्रयत्न केले. आता केवळ प्रवासी तिकिटाच्या महसुलावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत विकसित करणे, तसेच महामंडळाच्या सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करणेदेखील आवश्यक आहे, असे सांगत, दैनंदिन व्यवस्थापनामध्ये काटकसर करणे तितकेच महत्त्वाचे असून त्यादृष्टीने कृतीशील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश मंत्री अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले.

 

 

सध्या शासनाच्या मंजूरीनंतर पूर्ण आसन क्षमतेने एसटीची वाहतुक सुरू आहे. एसटीचे दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करुन ना नफा ना तोटा पातळीपर्यंत महामंडळाचे आर्थिक उत्पन्न येण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या उपाययोजनांच्या बरोबरच शासनाच्या विविध विभागांकडे सवलतीपोटी प्रलंबित असलेली एसटी महामंडळाची रक्कम तातडीने मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनादेखील अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 4:39 pm

Web Title: shivsena leader anil parab informs about state transport losses and other important facts vjb 91
Next Stories
1 “आपली ५० टक्के मतंही न राखू शकणाऱ्या…”; प्रवीण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका
2 विधान परिषद पोटनिवडणूक: काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरिश पटेलांची काँग्रेसवर मात
3 सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Just Now!
X