भाजपाचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांना शपथविधीनंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याच्या मुद्यावरून राज्यातील राजकारणात भाजपाविरोधात टीकेचा सूर उमटू लागला आहे. उदयनराजे यांना दिलेल्या वागणुकीवरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि संभाजी भिडे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (२२ जुलै) पार पडला. यावेळी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सगळ्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यावरून सभापतींनी त्यांना समज दिली. या मुद्यावरून आता भाजपावर टीका होऊ लागली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपा व संभाजी भिडे यांच्या टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातार बंदची अद्याप घोषणा नाही… जय भवानी, जय शिवाजी,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

काँग्रेसकडून भाजपावर निशाणा…

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो. शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखं राज्य चालवत आहे. जाहीर निषेध,” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

शपथविधी वेळी काय घडलं?

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली होती.