News Flash

विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

जे राज्य तुम्ही पाच वर्ष चालवलं. तो महाराष्ट्र बदनाम करून तुम्हाला काय मिळवायचं आहे?

राज्यात करोनाचं संकट उद्भवलेलं असताना पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड घडलं. या हत्याकांडावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. पालघरमधील घटनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षाचं अधःपतन महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झालं नव्हतं,” असं म्हणत “विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय आणि घर राजभवनाच्या दारात आहे का?,” असा सवाल राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे.

राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्न आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं. पालघर हत्याकांडावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबद्दल बोलताना राऊत म्हणाले,”विरोधी पक्षाचं अधःपतन महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालं नव्हतं. सध्या राज्यामध्ये देशामध्ये प्रसंग काय आहे? आणि तुम्ही राजकारण काय, कसलं करत आहात? तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल. तुमचा काही आक्षेप वा तक्रारी असतील, तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने त्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी जाऊन बोलायला हवं, की “मुख्यमंत्री महोदय पालघर घटनेप्रकरणी आम्हाला अमूक एक वाटतं आणि कारवाई नीट होत नाही.” शेवटी कोणताही गुन्हा सरकारच्या इशाऱ्यावर घडत नाही. मग काल उत्तर प्रदेशमध्ये एकाला ठेचून मारलं, त्याला काय योगी आदित्यनाथ यांना विचारून मारलं की तिथल्या गृहमंत्र्यांना? गुन्हे घडतात, अशा गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवण्याचं काम सरकार करतं. सरकारनं २४ तासांमध्ये शंभरच्यावर आरोपींना अटक केली. एकही आरोपी सुटलेला नाही. ही सरकारची कारवाई आहे. हत्या साधूंची असो की सामान्य माणसाची, हे वाईटच आहे,” असं राऊत यांनी सांगितलं.

संपूर्ण विरोधी पक्ष २४ तास राजभवनाच्या दारात

“विरोधी पक्षनेत्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून करोनाची लढाई लढण्यामध्ये सरकारला आणि राज्याला मदत केली पाहिजे. पण, आमचा संपूर्ण विरोधी पक्ष २४ तास राज भवनाच्या दारात उभा आहे. विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय किंवा घर काय राज भवनाच्या दारात आहे का? राज भवनात जाऊन एखादी तक्रार करू शकता. विरोधी पक्षनेत्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे उत्तम संबंध आहेत, असं मी मानतो. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन करून थेट बोलायला हवं. त्यात राज्याचं हित आहे. तुम्ही राज्य अस्थिर करायला निघाला आहात. जे राज्य तुम्ही पाच वर्ष चालवलं. तो महाराष्ट्र बदनाम करून तुम्हाला काय मिळवायचं आहे? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 12:48 pm

Web Title: shivsena leader criticised opposition leader devendra fadnavis bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! मिरजमध्ये लॉकडाउनमध्ये अडकलेल्या तरुणीला दारु पाजून सामूहिक बलात्कार
2 पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
3 लॉकडाउनमुळे बंगळुरूत अडकलेल्या मिथुन चक्रवर्ती यांना पितृशोक
Just Now!
X