शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं. संजय राऊत यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान राजकारणातील वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यातील महाविकास आघाडी, विरोधीपक्ष, भाजपा अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. या मुलाखतीच्या शेवटी घेण्यात आलेल्या रॅपीड फायर प्रशोत्तरांमध्ये त्यांनी मोदींचे कौतुक केलं.

भाजपावर टीका…

“भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं भाजपाचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका राऊत यांनी या मुलाखतीमध्ये केली. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.

मोदींचा चांगला गुण काय?

संपूर्ण मुलाखतीमध्ये भाजपावर टीक करणाऱ्या राऊत यांनी मुलाखतीच्या शेवटी मात्र मोदींचे कौतुक केलं. कार्यक्रमाच्या शेवटी रॅपीड फायरमध्ये प्रत्येक नेत्याचा चांगला गुण काय आणि त्याला काय सल्ला द्याल असं राऊतांना विचारण्यात आलं. या यादीमध्ये पहिलेच नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होते. “मोदींना काय सल्ला द्याल आणि त्यांचा चांगला गुण कोणता?,” असा प्रश्न राऊतांना विचारला. “नरेंद्र मोदी हे प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्यासारखी मेहनत कोणी करणार नाही,” असं राऊत मोदींबद्दल बोलताना म्हणाले.

पत्रकार म्हणून मोदींना एकच सांगेन…

“ते देशाचे पंतप्रधान आहेत. काय करायचं आहे याबद्दलची प्रत्येक गोष्ट त्यांना ठाऊक आहे. त्यांना सल्ला द्यायचा मला अधिकार नाही,” असं राऊत यांनी सांगितलं. मात्र पत्रकार म्हणून मोदींना राऊत यांनी एक सल्ला दिला. “पत्रकार म्हणून मोदींना मी एकच सांगेन की त्यांनी त्यांच्या आसपास, सहकाऱ्यांचं काय चाललंय काय नाही ते पहायला पाहिजे,” असा सल्ला राऊत यांनी मोदींना दिला.